मुंबई – माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपने प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. या पत्रात आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात पक्ष संघटन वाढविण्यााठी अथक परिश्रम कराल ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
काही दिवसापूर्वीच सानप यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सानप यांच्यात राज्यात काम करण्याची क्षमता आहे. त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
असे परतले होते स्वगृही
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सानप यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी केली होती. पण, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते पुन्हा काही दिवसापूर्वीच स्वगृही परतले. त्यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदीची जबाबदारी देण्यात आली आहे.