मुंबई – माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नरिमन पाँईंट येथील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन हे उपस्थितीत होते. या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सानप यांच्यात राज्यात काम करण्याची क्षमता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सानप यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल. या घोषणेमुळे सानप यांच्यावर राज्यपातळीवरील संघटनात्मक जबाबदारी येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहे. सानप यांच्या येण्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला आहे. पुढील निवडणुकीत नाशिकमध्ये खासदारही भाजपचा राहील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सानप यांनी केलेल्या भाषणात सांगितले की, मधल्या काळात दुरावा झाला. पण, संघ व भाजपचं काम केलेेला माणुस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या काळात भाजपकडून विकासासाठी जास्तीत जास्त काम करेल.
पुन्हा स्वगृही परतले
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सानप यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी केली होती. पण, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतले आहे. त्यांच्या या प्रवेश सोहळ्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईत उपस्थितीत होते. भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही या सोहळ्यात हजेरी लावली. तर काही नेते गैरहजर होते.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये होणार फायदा
भाजपला सानप यांच्या घरवापसीमुळे महानगरपालिका निवडणुकीत फायदा होणार आहे. गेल्या वेळेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवली होती. त्यावेळी ६७ नगरसेवक निवडून आले होते.
भाजपमध्ये सुप्त संघर्ष
सानप यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सुप्त संघर्ष वाढला आहे. सानप यांना उघड विरोध कोणी केलेला नसला तरी अनेक नेते त्यांच्या प्रवेशामुळे नाराज आहे.