नाशिक – माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहे. २१ डिसेंबरला ते मुंबईत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसापासून ते शिवसेनेत असूनही ते फारसे सक्रिय नव्हते. या प्रवेशाबाबत सानप यांनी दुजोरा दिला असून हा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट नाकरल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी केली होती. पण, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये होणार फायदा
भाजपला सानप यांच्या घरवापसीमुळे महानगरपालिका निवडणुकीत फायदा होणार आहे. गेल्या वेळेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवली होती. आता त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहे.