काठमांडू – जगातील सर्वात उंच पर्वत शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची वाढली आहे. नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची शंका होती. मात्र, नेपाळ सरकारने उंची बाबत अधिकृत घोषणा केली आहे. सध्या माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर एवढी आहे. ही उंची पूर्वीपेक्षा २.८ एवढी आहे.
जगातील सर्वोच्च शिखराच्या उंचीचे अचूक मोजमाप मिळविण्यासाठी सुमारे एक वर्षापासून डेटा संग्रहित करण्याचे काम केले जात होते. नेपाळच्या सर्व्हे विभागाने एव्हरेस्टची नवीन उंची जाहीर करण्याच्या कार्यक्रमाची माहिती देऊन सर्व माध्यम संस्था आणि पत्रकारांना आमंत्रण पाठविले. या कार्यक्रमात ज्या व्यक्ती सक्रीय सहभागी झाल्या होत्या त्यांचाही सन्मान करण्यात आला.
विनाशकारी भूकंपासह अनेक कारणांमुळे उंची बदलू शकेल अशा शिखराची नेमकी उंची मोजण्याचे कार्य नेपाळ सरकारने हाती घेतले होते. १९५४ मध्ये भारतीय सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची उंची ८ हजार ८४८ मीटर एवढी आहे. तर १९७५ मध्ये चिनी सर्वेक्षणकर्त्यांनी माउंट एव्हरेस्टचे मोजमाप केले आणि त्याची उंची समुद्रसपाटीपासून ८ हजार ८४८.१३ मीटर मोजली होती. त्यामुळे नव्या सर्वेक्षणात ही उंची तेवढीच असेल की कमी झालेली असेल याबाबत जगभरातच मोठी उत्सुकता होती. अखेर माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झालेली नाही तर वाढलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.