मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर त्यांच्याच एका गाण्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठते आहे. तर यामुळे दोन कलाकारांमध्ये फेसबुकवर वाद सुरु झाले आहेत. दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी या गाण्यावर टीका करताना यापेक्षा गाई म्हशींचे हंबरणे बरे, असे म्हटले आहे. हा आवाज सहन करणे शक्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. टिळेकरांच्या या टीकेवरून अभिनेता आरोह वेलणकर यानेही टीका केली आहे. तुम्ही केलेली ही टीका वाचून आम्हाला लाज वाटली. तुम्ही ‘मराठी तारका’ कार्यक्रम करता ना, मग महिलांवर टीका करता ? तुम्हाला आवडत नसेल तर नका ऐकू. पण टीका करताना तारतम्य बाळगा, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.
वेलणकर यांच्या या टीकेवर टिळेकर यांनी तोंडसुख घेतले आहे. त्यांच्या गाण्यावर टीका केली तर तुझा थयथयाट का होतो आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे. तुझ्या बापाचं राज्य आहे का, मला धमकी द्यायला ? तुझं जितकं वय आहे ना तितकी माझी कारकीर्द असल्याचेही टिळेकर यांनी सुनावले आहे. जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून घेणा-यातला मी नाही. हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे, असे आव्हानच त्यांनी वेलणकर याना दिले आहे.