नाशिक – गेल्या २८ डिसेंबरला नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांना जाग आली आहे. त्यामुळेच शहरात नायलॉन मांजाचा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. दरवर्षी नायलॉन मांजाचा प्रश्न भेडसावत असताना पोलिसांनी महिलेचा बळी जाण्याची वाट बघून मग आदेश प्रसिद्ध केल्याने शहरभर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २८ डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे मान कापली जावून महिलेचा मृत्यू झाल्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. अशा स्वरूपाच्या घटना आणखी घडू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने ३० डिसेंबर ते २८ जानेवारी या कालावधीत पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी करण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त विजय खरात यांनी आदेशानुसार कळविले आहे.
आदेशात नमूद केल्यानुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलक १४४ (१)(३) अन्वये खबरदारीचा उपाय म्हणून पतंग उडविणेसाठी वापरण्यात येणाऱ्या मांजासाठी नायलॉन दोरा निर्मिती, ज्या माज्यांना काचेची कोटींग आहे, साठा व वापरावर मनाई करण्यात येत आहे. मकर संक्रांती सणानिमित्त शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगाना वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन दोऱ्याचा असल्याचे निदर्शनास आला आहे. पतंग उडवितांना दोन पतंगांमध्ये पेज झाल्याने तुटलेला दोरा झाडे व इमारतीमध्ये अडकतो व त्यानमुळे वन्य पशुपक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच या मांज्यामुळे रस्त्याने जाणारे दुचाकी वाहनचालक व शाळेतील सायकलवरील विद्यार्थी हे अपघात होऊन जखमी होऊ शकतात. नायलॉन मांजा तुटला जात नाही व त्याचा नाशही होत नसल्याने तो पर्यावरणास सुध्दा हानिकरक ठरत आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता १९६० या कायद्याच्या कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील, असे पोलीस उप आयुक्त विजय खरात यांनी आदेशान्वये कळविले आहे.