स्कॉटलंड – येथील सरकारने महिलांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या मोफत वितरणाबाबत एक कायदा तयार केला आहे. तेथील बहुतांश चॅरिटी संस्थांतर्फे सदर प्रकरणावर आवाज उठवला गेला होता. ‘पीरियड पॉवर्टी’ वाढत असल्याचे मत संस्थांनी व्यक्त केले होते. याच आधारावर सरकारने नवा कायदा केला असून याद्वारे महिलांना आता मासिक पाळीशी संबंधित सर्व उत्पादने मोफत मिळणार आहेत.
मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड मोफत देणारा स्कॉटलंड हा जगातील पहिला देश बनला आहे. स्कॉटिश संसदेत बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याद्वारे कायदा तयार करून मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार आहेत. मतदानाच्यावेळी संसदेच्या सदस्या मोनिका लेनॉन म्हणाल्या की, महिलांना मिळत असलेल्या सॅनिटरी पॅड विषयी असुरक्षितता बाळगण्याची आवश्यकता नाही. एप्रिल २०१९मध्ये लेनॉन यांनी सर्वप्रथम संसदेत सदर प्रस्ताव ठेवला होता. या कायद्यानुसार, सार्वजनिक क्षेत्र, युवा क्लब, शौचालये आणि मेडिकल येथे सॅनिटरी पॅडस ठेवले जाणार आहेत. महिला आणि मुलींसाठी याठिकाणी मोफत सॅनिटरी पॅड वितरित केले जाणार आहेत.