नवी दिल्ली- लॉकडाउनच्या काळातही काही युवतींनी कल्पकतेच्या माध्यमातून अनोखे कार्य केले आहे. उद्योजक बनण्याची त्यांची ही पायरी असून, त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. अशाच काही यशकथा समोर आल्या आहेत.
प्रियंका प्रभाकर यांनी कोविड टाळेबंदीच्या काळात घराबाहेर पडायचे नाही म्हणून युवावर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी ‘स्टेम’ (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथ्स यांच्यावर आधारित) एक नवी ‘बोर्ड गेम’ विकसित केला आणि या खेळाच्या विक्रीतून बंदच्या काळामध्ये ४० लाख रुपयांची कमाई केली.
मेघना गांधी या बडोद्यामध्ये वंचित महिलांसाठी काम करतात. त्यांनी या टाळेबंदीमध्ये कोविडसाठी उपयुक्त ठरतील अशा पर्यावरणस्नेही वस्त्रांची तसेच संबंधित वस्तूंची निर्मिती केली आणि जवळपास २५ लाख रुपयांपर्यंत विक्री केली. तर छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातल्या मच्छीमारांसोबत कार्य करणा-या स्नेहल वर्मा यांनी कोविड महामारीच्या काळामध्ये मच्छिमारांचे उत्पादन कसे वाढेल, यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) यंत्रणा तैनात करून जलाशयांचा दर्जा आणि मासेमारीच्या हंगामात सुधारणा घडवून आणली. या तिन्ही महिला उद्योजक विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कार्य करीत आहेत.
या तिन्ही उद्योजिकांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे महिला उद्योजकता आणि सशक्तीकरणा ने(डब्ल्यूईई) आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या उद्योजिकांमध्ये महाविद्यालयीन युवतींपासून ते मध्यमवयीन गृहिणींपर्यंत उद्योजिका आहेत. त्यांनी अतिशय व्यावहारिक विचार करून उद्योजिका म्हणून करिअर करताना आपल्या व्यवसायाची निवड केली आहे. दिल्लीच्या आयआयटी येथे महिला परिसंस्थांना बळकटी देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवला आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या उपक्रमासाठी सहकार्य देऊ केले आहे. या ११ उद्योजिकांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले. उद्योजिकांना पुरस्कार स्वरूपामध्ये एकूण २५ लाखांचे अनुदान देण्यात आले.
डब्ल्यूईई प्रतिष्ठान ही संस्था आयआयटी दिल्लीच्या वतीने सामाजिक आणि राष्ट्रीय कल्याणाच्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन पाठिंबा देणारी संस्था आहे. या प्रतिष्ठानमार्फत देशातल्या महिलांना उद्योगासाठी समर्थन देऊन त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत पुरवून उद्योग उभारणी आणि त्यांचे पालन-पोषण करण्यासाठी सहकार्य केले जाते. तसेच संपूर्ण भारतामधल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनासाठी संभाव्य गुंतवणूकदार आणि खरेदीदार यांच्यामध्ये सेतू म्हणून कार्य करण्यात येते. याचबरोबर व्यवसायामध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिरता येऊन टिकून राहण्यासाठी व्यावसायिकतेची कल्पना स्पष्ट करण्याचे काम प्रतिष्ठानमार्फत केले जाते.
‘‘व्यवसायामध्ये नावीन्य आणतानाच गरजांची निर्मिती कशी होते, त्यामध्ये वैविध्य आणून समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्यांना मेंटॉरशिप, नेटवर्किंग, माहितीची साधने, आर्थिक मदत आणि धोरणात्मक स्तरावर सबलीकरणाची गरज आहे, अशा उद्योजिकांना डब्ल्यूईई प्रतिष्ठानने दिलेले व्यासपीठ अत्यंत उपयोगी ठरत आहे,‘‘ असे प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी यावेळी सांगितले.