नाशिक – शहरातील महिला रुग्णालयाचे कामकाज रखडले असून याप्रकरणी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी त्यासंदर्भात माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भाभानगर येथील शंभर खाटांचा स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. केवळ आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठे पायी महिला रूग्णालयाचा जागेचा प्रश्न सूटत नाही ही खरी महिलांसाठी शोकांतिका आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांना अनेक दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते अशा वेळी परिस्थितीने सर्व सामान्य महिलांना शहरात मोक्याच्या ठिकाणी रूग्णालय असले तर त्याचा निश्चितच फायदा होईल मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करत रूग्णालयाच्या जागे संदर्भात जाणूनबूजून अडचणी निर्माण करण्याचे काम काही प्रतिष्ठित नागरिकांकडून होतांना दिसत आहे. यासाठी शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी म्हण प्रचलित असतांना देखील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिनांक २९ ऑक्टोबर च्या आत नासिक महानगर पालिका ने बांधकामा संदर्भात खुलासा करावा असे निर्देश न्यायालयाने सुनावले आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भामरे यांनी सांगितले आहे की, वास्तविक पाहता दादा साहेब गायकवाड सभागृहा जवळील वाहन तळाची जागा महिला रूग्णालयाला अत्यंत योग्य आहे. जुने नाशिक, इंदिरा नगर, भाभा नगर, मुंबई नाका, व्दारका या भागात सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. संकटसमयी आजार उदभवल्यास महिलांना रूग्णालय कमी अंतरावर उपलब्ध होईल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रूग्णालय असणे खरे तर काळाची गरज आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस दिनांक २९ ऑक्टोबर च्या न्यायालयीन खुलाशा नंतर महिला रूग्णालयासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा देखील करेन. महाविकास आघाडी सरकार ने याबाबत त्वरित हस्तक्षेप करत महिलांना न्याय मिळवून द्यावा, ही माफक अपेक्षा देखील महिलांच्या वतीने करीत असल्याचे भामरे यांनी पत्रकात म्हटले आहे.