मनाली देवरे, नाशिक
…..
जिओ वुमन्स टी – २० चॅलेंज स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात व्हेलोसिटी संघाने सुपरनोव्हाज संघाचा ५ गडी राखून पराभव केला. सुपरनोव्हाज संघाने सन २०१८ आणि २०१९ च्या दोन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत. परंतु पहिल्याच सामन्यात व्हेलोसिटीने सुपरनोव्हाजचा पराभव करून खळबळ उडवली.
गोलंदाज एकता बिश्तने ४ षटकात २२ धावा देवून घेतलेले ३ बळी आणि धावांचा पाठलाग करतांना सुषमा वर्माच्या ३४ धावा आणि स्युन लूसने केलेल्या ३७ धावा या कामगिरीच्या जोरावर व्हेलोसिटीने हा विजय साध्य केला. स्युन लूस या सामन्याच्या वुमन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरली
पुरूष आयपीएल २०२० या चिञपटातील कथानकाचा आता शेवटचा थरार सुरू झालेला आहे. या शेवटच्या टप्यात खेळाडूंना विश्रांती मिळावी या अनुशंगाने सलग सामने खेळवले जात नाहीत. मधल्या वेळेत ज्यादिवशी पुरूष आयपीएलचा सामना नसतो, त्या दिवशी महिलांच्या मिनी आयपीएल स्पर्धेचे आयोजन सन २०१८ पासून सुरू करण्यात आले होते. महिला टी२० चॅलेंज या नावाने खेळली जाणारी ही स्पर्धा यावर्षी जिओ वुमन्स टी२० चॅलेंज या नावाने खेळवली जात असून यात सुपरनोव्हाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन महिला संघाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेअंतर्गत तीन साखळी सामने खेळवले जातील आणि साखळीतील निकालाच्या आधारावर पहिल्या दोन क्रमांकावर स्थान पटकावणा–या संघात अंतिम लढत होईल. ५ नोव्हेंबरला व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स, दि.७ नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स वि, सुपरनोव्हाज आणि ५ नोव्हेंबरला शारजा मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाईल.
सुपरनोव्हाज संघाची मदार भारतीय महिला क्रिकेटमधील युवा खेळाडू हरमनप्रित कौर हिच्यावर आहे. ती या संघाची कर्णधार आहे. याखेरीज, जेमीमा रॉडरीग्ज, प्रिया पुनिया आणि आयुषी सोनी या संघातील स्टार खेळाडू आहेत. या संघाची फिरकी गोलंदाजीतली ताकद अफाट आहे. लेगस्पीनर पुनम यादव, राधा यादव आणि ऑफ स्पिनर अनुजा पाटील यांच्यावर या गोलंदाजांवर या संघाची मदार असेल.
व्हेलोसिटी संघाची जबाबदारी अनुभवी भारतीय महिला खेळाडू मिताली राज हिच्या खांदयांवर असेल. या संघात युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश आहे. सलामीची शफाली वर्मा, डॅनिएन वॅट, मधल्या फळीतल्या सुषमा वर्मा आणि वेदा कृष्णमुर्ती यांच्या खेरीज अष्टपैल शिखा पांडे, बांगला देशची मध्यमगती गोलंदाज जहाना आलम, आतंरराष्ट्रीय स्तरावर १४४ बळी घेणारी ले कॅस्पेरेक आणि लेगस्पिनर स्युन लूस यांची कामगिरी बघण्यासारखी ठरणार आहे.
ट्रेलब्लेझर्स हा संघ तुलनेने नवख्या खेळाडूंचा संघ आहे. स्म़ती मंधाना, दिप्ती शर्मा, पुनम राउत, सिमरन दिलबहादुर आणि विकेटकिपर बॅटसमन नुजहत परवीन ट्रेलब्लेझर्सकडून खेळतांना आपले कसब आजमावणार आहेत.