मथुरा- प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या करणा-या महिला गुन्हेगार शबनमला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतात पुरुषांनाच ही शिक्षा झाली आहे. पण, एक महिला गुन्हेगाराला भारतात पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. या फाशीची तारिख अद्याप निश्चित नाही. पण, ठिकाण मात्र ठरले आहे, ही फाशी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगात दिली जाणार आहे.
शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने बावनखेडी या गावात १५ एप्रिल २००८ ला आपल्याच कुटुंबातील आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्या अशा सात जणांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर दोघांना अटक झाली व कोर्टात खटला चालला. त्यानंतर अमरोहा कोर्टाने फाशीचा निर्णय दिला. या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टानेही अमरोहा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी दिली जाणार आहे.