नंदुरबार – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
शहादा तहसिल कार्यालयात कोविड-19 आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्य्वस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख म्हणाले महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. अशा प्रकरणात गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलिसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा.
नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने पोलीसांवर अधिक जबाबदारी आहे. नवापूर आणि शहादा पोलीस ठाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल. नंदुरबार पोलीस दलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले दुर्देवी असून असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
कोविडसारख्या संकटात जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्ह्याने पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमही राबविले त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी येत्या काळात दक्षता बाळगण्याची गरज आहे. युरोपात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परीस्थिती बिकट झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, जिल्ह्यात पोलीस दलाने कोरोना काळात चांगली कामगिरी केली असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
मास्क बनविणाऱ्या बचतगटाचे कौतुक
गृहमंत्री देशमुख यांनी बैठकीपूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सरस्वती महिला बचत गट आणि ओमसाई महिला बचत गट यांनी तयार केलेल्या मास्क आणि इतर उत्पादनाची पाहणी केली. कोरोना संकटकाळात मास्क निर्मिती करुन प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांनी बचतगटाचे कौतुक केले. त्यांनी महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: मास्कची खरेदी केली.