मा.बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय प्रचार व प्रसिध्दी मेळाव्याचे आयोजन शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, मालेगाव कॅम्प येथे करण्यात आले होते. कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक संजिव पडवळ, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, उप महापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवेरे, कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक रविंद्र पाटील, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, नांदगावचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, डॉ.सचिन हिरे, प्रमोद निकम, मनोहर बच्छाव, भारत देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी महिला शेतकरी दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फलोत्पादन यामध्ये आपली भूमिका चोख पार पाडतांना दिसतात. महिला पुरुषांपेक्षा अधिक मेहनती, व्यवहारिक आणी कार्यकुशल असुनही त्यांना मिळणारं दुय्यम स्थान ही खेदाची बाब आहे. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता असून निदान ज्या महिला स्वत: जमीनधारक आहे त्यांच्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प मालेगांव तालुक्यात राबविण्याची संकल्पना मांडली. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान या प्रकल्पात शेती विषयक सर्व बाबींचा समावेश केला असून हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे मंत्री भुसे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळाली असून यासाठी कृषी विभागाच्या प्रत्येक जिल्हा व तालुका कार्यालयात शेतकरी सन्मान व मागदर्शन कक्षाची स्थापना जानेवारी २०२० पासून करण्यात आली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची दर्जेदार रोपे स्थानिकरित्या उपलब्ध होण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात २ रोपवाटिका तयार करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना सुरु करण्यात आली आहे. तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान संकुल स्थापन करुन ५ शासकीय कृषी महाविद्यालयास मंजुरी मिळाली असून यात कृषी, उद्यानविद्या, अन्नतंत्रज्ञान, कृषिव्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रीक तंत्रज्ञान ह्या महाविद्यालयाचा समोवश करण्यात आला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शेती विषय तंत्रज्ञान अद्ययावत करुन तालुक्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
रिसोर्स बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्याना मिळणार दिलासा
शेती उत्पादनासोबतच शेतमाल विक्री व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. किंबहुना शेतकऱ्यांना शेती उत्पादन तंत्रज्ञान पेक्षा कृषी व पणन विभागाने विक्रीसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री या संकल्पनेतून तालुका व जिल्हा स्तरावर विक्री केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात अनेक शेतकरी स्वत: प्रयोगशील शेती करत असतात, त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्यासाठी शेतकरी रिसोर्स बँक संकल्पना मांडण्यात आली. आजतागायत राज्यात ५ हजार रिसोर्स शेतकरी बँक स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर शेती व शेतीपुरक व्यवसाय नियोजन करणेसाठी राज्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी समीती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी भागातील रानभाज्यांना एक ओळख व बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रानभाज्या महोत्सव घेऊन त्यांना स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतर्गत यापूर्वी अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या नावाने सातबारा उतारा असला तरच लाभ मिळत होता. यात बदल करुन शेतकऱ्यांबरोबरच आणखी एका व्यक्तीचा या कार्यकक्षेत समावेश करुन योजनेत बदल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेणेसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता लागू नये म्हणून महाडिबीटी पोर्टल सुरु करण्यात आले असून सर्व योजनांसाठी वेळोवेळी अर्ज करण्याची यापुढे आवश्यकता भासणार नाही.
कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिलांसाठी आरक्षण व मदतीसाठी प्रयत्नशिल
कृषी विभागामार्फत राज्यामध्ये कमीत कमी २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असाव्यात अशा मार्गदर्शक सुचनेत बदल करण्यात आला असून राज्यात ६२ हजार शेतीशाळांच्या माध्यमातुन ८ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर जावून तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून १० हजार कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या संकटातही महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने प्राप्त रक्कमेचे ३०.७७ लाख पात्र लाभार्थ्यांना तात्काळ १९ हजार ६४४ कोटी पिक कर्ज वाटप करण्यात आले.
राबणाऱ्या हातांना व त्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवूण देणार
कोरोनाच्या संकट काळात तालुक्यातून पुणे, मुंबई, नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा पुरवठा करून शेतकरी राजाने जनतेची सेवा केली आहे. अशा शेतकरी राजा सोबतच राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या हातांना व घामाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सर्व प्रथम ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पौष्टीक तृणधान्य भित्तीपत्रकाचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलवर माती नमुने तपासणी केंद्र, कांदा पेरणी यंत्र, मका सोलणी यंत्र, विकेल ते पिकेल स्टॉलचा समावेश होता. १४५ ग्रामपंचातीमध्ये बसविण्यात येणाऱ्या फलकांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात फलकांचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांना मास्कचे वितरण
महिला शेतकरी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला शेतकरी सहभागी झाल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांना मास्कचे वितरण करण्यात आले होते. त्याच बरोबर सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस एक रोप या प्रमाणे रोपांचे वाटपही मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यावेळी महिला शेतकऱ्यांमध्ये अंधश्रध्दा व अनिष्ट रुढी परंपराना फाटा देण्यासाठी डॉ.प्रतिभा जाधव यांनी उपस्थितांना समुपदेशन केले. तर दाभाडी येथील महिला शेतकरी भावना निळकंठ निकम यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे याबाबत मार्गदर्शन करत महिला शेतकऱ्यांना संघटीत होण्यासाठी आवाहन केले. सातमाने येथील कु.निशा जाधव हिने महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी काही संदेशही यावेळी दिले.