नाशिक – नाशिकमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मोठी खुषखबर दिली आहे. कंपनीने त्यांच्या कामगारांना तब्बल ५० हजार ते १ लाख ६ हजारापर्यंतचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, या घोषणेमुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
कोविड १९ या जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट असताना महिंद्रा कामगारांना मिळालेल्या या बंपर बोनसने कामगारांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. लॉकडाऊन मुळे एकीकडे पगार कपात, कामगार कपात होत असताना दुसरीकडे मात्र बोनस जाहीर झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, महिंद्रा कंपनी व्यवस्थापन यांनी युनियन पदाधिकाराऱ्यांसोबत मुंबई येथे सोमवारी बैठक घेतली. यात कामगारांना प्रत्येकी किमान सेवाजेष्ठतेनुसार ५० हजार ते १ लाख बोनस मिळणार असल्याचे महिंद्रा युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण व सरचिटणीस सोपान शहाणे यांनी सांगितले.
मुंबईत झालेल्या फेडरेशनच्या बैठकीला युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, सदस्य सुनील अवसरकर व भुवनेश्वर पोई उपस्थित होते.
महिंद्रा कंपनीचा बोनस जाहीर झाल्याने त्याचा नाशिक बाजार पेठेवर सकारात्मक परिणाम होत आहे. बोनस व पगार मिळून काही लाखो रुपये हातात पडणार असल्याने नाशिक बाजार पेठेत खरेदीसाठी गर्दी उसळणार आहे. यामुळे कामगारांबरोबर व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.