बारामती – राज्य शासनाने आणलेल्या ‘महाराष्ट्र कृषीपंप धोरण – २०२०’ ची अंमलबजावणी महावितरण बारामती परिमंडलात जोरदार सुरु असून, या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी खास लोकप्रतिनिधींसाठी तयार केलेल्या मोबाईल ॲपची माहिती खा. सुप्रियाताई सुळे यांनी घेताना लागलीच मतदार संघातील १० ठिकाणी नवीन वीज उपकेंद्राची मागणीही ऑनलाईन नोंदवली आहे.
मुख्य अभियंता सुनील पावडे व अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी खा. सुळे यांना बारामती लोकसभा मतदार संघात राबवत असलेल्या कृषीपंप योजनांची माहिती दिली. यावेळी मतदार संघातील सर्व कृषीपंप ग्राहकांनी आपली बिले भरावीत व कृषी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. सुळे यांनी केले असून, शासनाने सुरु केलेल्या या ऑनलाईन उपक्रमाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना धन्यवाद दिले आहेत.
प्रलंबित कृषी वीज जोडण्या देण्यासोबतच ग्रामीण भागातील वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाने ‘कृषीपंप धोरण – २०२०’ आणले आहे. या योजनेतून पंधरा दिवसात ८९० वीज जोडण्या दिल्या आहेत. तर कृषीपंपाच्या थकबाकीचे पनुर्रगठण करुन दंड-व्याज माफ करत सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम प्रथमवर्षी भरल्यास उर्वरित रक्कम माफ होणार आहे. जमा रकमेपैकी ३३ टक्के निधी संबंधित ग्रामपंचायत हद्दीत तर ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.
पायाभूत सुविधांची मागणी खासदार व आमदार यांना ऑनलाईन करता येणार
‘कृषी आकस्मिक निधी’तून ग्रामीण वीज यंत्रणेला बळकटी मिळणार आहे. नवीन उपकेंद्र, उपकेंद्रामधील विद्यमान रोहित्राची क्षमता वाढविणे, नवीन वितरण रोहित्र, विद्यमान वितरण रोहित्राची क्षमता वाढविणे, उच्च दाब वाहिनी व लघु दाब वाहिनी आदी पायाभूत सुविधांची मागणी खासदार व आमदार यांना ऑनलाईन करता येणार आहे. खा. सुप्रियाताईंनी त्यांच्या मतदार संघातील कऱ्हा वागज, झगडेवाडी, करंजे, निरगुडे, कानगाव, भोर, न्हावी, बेलसर, राजेगाव व दिवे या १० ठिकाणी नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रे तर सुपा येथील उपकेंद्राची क्षमता वाढ करण्याची मागणी मोबाईल ॲपमधून नोंदवली आहे.