सिंधुदुर्ग – शिवसेनेनं जनादेशाचा अनादर केला, आणि केवळ सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं भाजपा नेते नारायण राणे यांनी उभारलेल्या वैदयकीय महाविद्यालयाचं उद्धाटन करताना बोलत होते.
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ऑटोरिक्षासारखं असून सत्तेतले तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेनं चालत आहेत, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन बंद दाराआड दिलं होतं, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला.
असं आश्वासन द्यायचं असतं तर आपण ते उघडपणे दिलं असतं. निवडणूक प्रचारात देवेंद्र फडनवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी माहिती दिली जात होती. त्यावेळी शिवसेनेनं त्यावर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला.
गेल्या ७० वर्षात केवळ २ एम्स होती आता २२ एम्स तयार होत आहेत. यातली १८ पूर्णही झाली आहेत, असं शहा यांनी सांगितलं. वैदकीय महाविद्यालयांमधल्या जागा वाढवल्या जात आहेत. आज स्थानीय भाषेत नीटची परीक्षा देऊन मुलं परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. हे काम केंद्रसरकारन केलं आहे.
कोरोना काळात संपूर्ण जगात भारतातचा मृत्यू दर कमी होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने एकजूट होत कोरोनाचा सामना केला. हे फार मोठं यश असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.