मुंबई – सत्ताधारी महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहे. शिवसेना त्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र, या नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे.
औरंगबादच्या विभागीय आयुक्तांनी आरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ती मागणी आहे. तसेच, आजही शिवसेना त्यांच्या मुखपत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असेच करते. मात्र, या नामांतराला महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आली आहे. सर्वसामान्य व्यक्ती हा या प्रोग्रामचा केंद्रबिंदू आहे. कुठल्याही शहराचं नाव बदलण्याचं या प्रोग्राममध्ये नाही, असे काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. विकास करणे हे राज्य सरकारचे काम आहे. नाव बदलून काहीच होत नाही, असा टोलाही थोरात यांनी लगावला आहे.