मुंबई – महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी भेट झाली असून त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारवर अस्थिरतेचे ढग आहेत की काय, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही मंत्र्यांची बैठक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अस्वस्थ असून त्यांच्या वेगळ्याच हालचाली असल्याची शंका शिवसेनेला आहे. अजित पवार हे भाजपशी हातमिळवणी करतात की काय, अशी साशंकताही व्यक्त केली जात आहे. तर, शिवसेना आणि भाजप पुन्हा युती करुन सरकार स्थापन करणार का अशा वावड्याही उठू लागल्या आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यासह कोरोना व अन्य प्रश्नांबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यापुढील काळात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.