मुंबई – राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील ६० टक्के मंत्री आतापर्यंत कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळासमोरही कोरोनाचे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरात महाविकास आघाडी सरकारमधील ४३ पैकी २६ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशिवाय जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत. राष्ट्रवादीचे एकूण १६ पैकी १३ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काँग्रेसचे ७ आणि शिवसेनेचे ५ मंत्री बाधित झाले आहेत.
संसर्ग झालेल्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि संजय बनसोडे यांच्यासह प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.