नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अधिकारी, लेखक तथा ज्येष्ठ माध्यमकर्मी संतोष साबळे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. साबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. जनसंपर्क क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
संतोष साबळे यांनी गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पत्रकारिता केली आहे. मुक्त विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी असतानासुद्धा विद्यापीठाचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पोहोचवला. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपल्या लेखणीचा समावेश तसेच बालभारतीमध्ये भारताची धावपटू कविता राऊत यांच्या जीवनावरील धड्याचा समावेशदेखील झालेला आहे. माध्यम क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव तसेच साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील काम वाखाण्याजोगे आहे. विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या यशोगाथा पुस्तकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या आदेशान्वये सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी अलीकडेच त्यांची संघाच्या राज्य कार्यकारिणीवर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली.