सलग चौथ्यांदा निवड; नाशिकच्या व्यक्तीला प्रथमच बहुमान
नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते सलग चौथ्यांदा अध्यक्ष झाले आहेत.
महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या माहितीनुसार, चेंबरच्या घटनेनुसार दर दोन वर्षांनी कार्यकारिणी मंडळ आणि दरवर्षी चेंबरचे अध्यक्ष व वरीष्ठ उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येते. ही निवड वर्ष संपल्यावर सहा महिन्यात करावी अशी तरतूद आहे. यंदा वर्ष संपण्यापूर्वीच कोरोना महामारीविरूध्द लढा देण्यासाठी सरकारने टाळेबंदी जाहिर केली. ती अद्याप सुरूच आहे. दरम्यान, चेंबरमध्ये ऑनलाईन कामकाज सुरू करण्यात आले. अनेक सभा, परिसंवाद, कार्यशाळा वगैरे ऑनलाईन घेत चेंबरमध्ये व्यापार व उद्योग क्षेत्रातील रचनात्मक कार्य सुरू ठेवण्यात यश आले आहे. कार्यकारिणी मंडळ व पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेणे शक्य नव्हते. परंतु कार्यकारिणी मंडळ व व्यवस्थापन समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात आली. या सभेत प्रत्यक्ष निवडणुका न घेता विद्यमान पदाधिकाऱ्यांना व कार्यकारिणी मंडळास एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची सलग चौथ्यांदा चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी बी. डी. गरवारे, लालचंद हिराचंद आणि अभयकुमार कासलीवाल यांनी अध्यक्षपदाचा हा बहुमान प्राप्त केला होता. मात्र, नाशिकच्या व्यक्तीला प्रथमच सलग चौथ्यांदा बहुमान मिळाला आहे. मंडलेचा यांच्यासोबत वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उमेश दाशरथी, गौतम ठाकूर, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे या पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी फेरनिवड झाली आहे.