नाशिक – उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण, दक्षिण गुजरात मध्ये आज व उद्या (१५ व १६ ऑक्टोबर) डिप्रेशनने ढगफुटी आणि विलक्षण पावसाचा धोका असल्याचा दावा हवामान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. प्रशासन व नागरिक यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पुणे, रायगड, पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांनी विशेष काळजी घ्यावी, असेही जोहरे यांनी सांगितले आहे.
काय करावे?
प्रा जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे चार वाजेनंतर तापमानात जास्त घसरण होऊन पाऊस हा सकाळी पाच वाजेपर्यंत ढगफुटी होण्याची शक्यता वाढते.मान्सून पॅटर्न बदलाची आव्हाने व यंदा 15 आॅगस्ट ला सुरू झालेला मान्सून 15 डिसेंबर पर्यंत पाऊस देईल असे पाहता येणार्या काळात खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकर घरी जाऊन सुरक्षित व्हावे. अत्यंत आवश्यक नसेल तर रस्त्यावर वाहने घेऊन जाऊ नये. ढगफुटींमध्ये चारचाकी वाहने देखील वाहून जाऊ शकतात हे लक्षात घ्यावे. मात्र नागरिकांनी अभूतपूर्व पावसाला घाबरुन न जाता स्वतः ला, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी न्यावे. गरोदर महिला, वृद्ध तसेच बालकांकडे जातीने लक्ष द्यावे. आपले मोबाईल तसेच इनवर्टर आदी चार्ज करून ठेवावे कारण विजेचा प्रवाह खंडीत होऊ शकतो. शेतातून काढलेले धान्य सुरक्षित करावे कारण पाण्यात ते वाहून जाण्याचा धोका आहे अशी माहिती देखील भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. प्रशासनाला सहकार्य करावे आणि सदसद्विवेकबुद्धी वापरत निर्णय घ्यावा. नाहक आपला जीव धोक्यात जाईल अशी कोणतीही कृती नागरीकांनी टाळावी असे आवाहन ही प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.
अद्यावत यंत्रणा वाचवू शकते जीव
प्रा जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील अद्यावत तंत्रज्ञान यंत्रणा महाराष्ट्रात व भारतात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाटबंधारे विभाग आणि भारत हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)ची 500 किलोमीटर रेंजची मुंबई – पुणे – सोलापूर – नागपूर-गोवा येथील डॉप्लर रडार यंत्रणा यांनी प्रशासनाबरोबर समन्वय साधत काम केल्यास जिवित व वित्तहानी टाळणे शक्य आहे. डॉप्लर रडारने बोटाच्या पेरा एवढ्या भागात किती बाष्प-पाणी-बर्फ आहे याची अर्थात शास्त्रीय भाषेत याला लिक्विड वाॅटर कन्टेंट म्हणजे एलडब्लूसी म्हणतात याची अचूक माहिती व तया आधारे अक्षांश रेखांश नुसार आपल्या डोक्यावर किती मिलीमिटर पाऊस पडणार हे सहातास आधी कोट्यावधी नागरिक व शेतकर्यांना एका क्षणात मोबाईलवर हवामान खाते देऊ शकते. सॅटेलाईट व हजारो अॅटोमॅटिक वेदर स्टेशन्स बरोबरच 10 पेट्याफाॅली महणजे एकावर 16 शून्य इतकी गणिती आकडेमोड करणारा पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) चा सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) हवामान खात्याने वापरल्यास त्यामुळे खुप मोठे शेतीचे नुकसान आपण टाळू शकतो. मात्र ही यंत्रणा वापरली जावी यासाठी जनतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ही हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
आशिया खंडातील ढगफुटीची 6 तास आधी अलर्ट देणारा नोडल एजन्सी
प्रा जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा निधी देत जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) ने आशियाखंडातील देशांत होणार्या ‘ढगफुटीं’ चा सहातास आगाऊ ‘अलर्ट’ देण्याची जबाबदारी *’नोडल एजन्सी’* या नात्याने भारताकडे दिली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय गेल्या वर्षांपासून 236 वर्षे इतिहास आणि 145 वर्षा पुर्वी नामकरण झालेले भारत हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या भरवशावर ‘कार्यक्षम’ आहे. *आयएमडीने ‘फ्लॅशफ्लड (ढगफुटी) निर्देशन यंत्रणा (एफएफजीएस)’ उभारल्या आहेत*. आणि भारतासह आशियातील इतर देशांतील नागरिकांना ढगफुटी होण्याआधी सुचना त्या देत अहोरात्र मदत करीत आहेत. कोणत्या देशांना किती आधी ‘फ्लॅश फ्लड म्हणजे ढगफुटीचा अलर्ट’ देऊन किती नागरिकांचे प्राण वाचविले गेले ही माहिती व डाटाबेस आपल्या वेबसाईट टाकण्याचे काम ‘कार्यतत्पर’ आयएमडी अधिकारी लवकरच करतील अशी आशा आहे. अब्जावधी रुपये रडार साठी खर्चून, आशिया खंडातील इतर देशांना देत असलेला ‘ढगफुटी अलर्ट’ ढगफुटी होण्याआधी भारतीय शेतकऱ्यांना व जनतेला स्पष्ट मिळाल्याने सुयोग्य पावले उचलत नागरीकांचे प्राण वाचू शकतात.
फ्लॅशफ्लड म्हणजे ढगफुटी कशी होते? हैदराबाद ला घडले काय?
प्रा जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक हवामान संघटने (डब्ल्यूएमओ)च्या व्याख्येनुसार जेव्हा ढगातून कमीवेळात जास्त पाणी पावसाच्या रुपात जमिनीवर येते तेव्हा त्याला फ्लॅशफ्लड किंवा ढगफुटीं असे म्हणतात.
ढगफुटीसाठी ‘क्युमोलोनिंबस’ ढग आवश्यक असतात जे 12 ते 15 किलोमीटर उंची गाठू शकतात. विजांचा कडकडाट, चार मिलीमिटरकिंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आकाराचे पाणयाचे थेंब, महापुराने वाहनांचे अक्षरशः रस्तांवर तरंगणे आदी सर्व ढगफुटीची लक्षणे आहेत.
एखादा फुगा फुटुन अचानक एक ते वीस किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक परीसरात जेव्हा ताशी 100 मिलीमिटर दराचा असा पाऊस होऊन अब्जावधी लीटर पाणी जमिनीवर येते तेव्हा महापूर तयार होतो यालाच ‘फ्लॅशफ्लड’ म्हणजे’ ढगफुटी’ असे म्हणतात.
भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास सायंकाळी साडेचार तापमानात प्रचंड घसरण सुरु होते आणि ढगातील बाष्पाचे थंडावा लागल्याने पाण्यात रुपांतर होत पाऊस पडतो. परीणामी अपवाद वगळता बहुतेकदा ढगफुटी (फ्लॅशफ्लड) सायंकाळी 5 ते सकाळी 5 या वेळात मोठ्या प्रमाणात होते. सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होत तसेच अनेकदा जवळ समुद्र किनारा किंवा धरण आदी जलाशयाकडून आलेला बाष्पाचा साठा यांच्या एकत्रित परीणामामुळे *’क्युमोलोनिंबस’* ढग निर्माण होतात. परीणामी ढगफुटी होते. जेव्हा एखादे वादळ धडकते तेव्हा देखील ढगफुटींसारखा अगदी 400 मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस कोसळतो, मात्र तो वादळाने निर्माण झालेला पाऊस असतो त्यामुळे त्याला ढगफुटी म्हणत नाही कारण समुद्रातून बरोबर आणलेले सर्व पाणी असे चक्रीवादळ कमी वेळात जमिनीवर धडकतांना पावसाच्या रुपात ओतून देते.
हैदराबाद येथे डिप डिप्रेशन मुळे आलेले बाष्प व दिवसा सूर्यामुळे झालेले बाष्पीभवन यांचा एकत्रित परीणाम होत सायंकाळी साडेचार वाजे पासून साडे सहा वाजेपर्यंत अवघ्या दोन तासात जवळपास तिनशे मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्यामुळे याला डिप डिप्रेशन ने आलेला फ्लॅशफ्लड म्हणजे ढगफुटीच म्हणता येऊ शकते, असे जोहरे यांनी सांगितले आहे.