मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबतची सर्व कागदपत्रं राज्याच्या एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं एनआयए अर्थात, राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यावीत असा आदेश ठाण्यातल्या विशेष न्यायालयानं दिला आहे.
मनसुख प्रकरणी संपूर्ण तपास एटीएसने एनआयएकड़े सोपवावा, असे आदेश याआधीच केंद्रानं दिले होते. मात्र एटीएसनं हा तपास एनआयए कडे सोपवला नव्हता. एनआयनं हा तपास हस्तांतरण करण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसुख हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रं एनआयएकड़े हस्तांतरित करण्याचे आदेश ठाण्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी आज दिले.
हा तपास हस्तांतरित करतानाच एटीएसने दोनच दिवसांपूर्वी अटक केलेल्या विनायक शिदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एटीएसनं एनआयए कडे द्यावा, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. ही कागदपत्र द्यायला एटीएस विलंब करत असल्याचं एनआयएनं काल न्यायालयाला सांगितलं होतं. त्यावर न्यायालयानं आज हे आदेश दिले.