अक्षय कोठावदे, नाशिक
महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास लांबलेला असून १५ आॅगस्ट रोजी महाराष्ट्रात सक्रिय झालेला मान्सून १५ डिसेंबर २०२० पर्यंत बरसेल. मान्सून पॅटर्न मध्ये लक्षणीय बदल झाल्याने हा परीणाम होतो आहे. येत्या वेळात अचानक कमी वेळात जास्त असा पाऊस बरसेल. परीणामी ओल्या दुष्काळाने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी चांगली गोष्ट ही आहे की, दिवाळी पर्यंत विविध शेतीमालाला चांगले भाव मिळतील. सुयोग्य नियोजनाने शेतक-यांना दोन पैसे गाठीशी बांधता येतील अशी माहिती हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ ला दिली आहे.
केवळ शेतक-यांनी नाही तर संपूर्ण देशाने याबाबत विचार केला पाहिजे असे ‘अंदाज नव्हे माहिती!’ ही सेवा गेल्या १० वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देणार्या हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. भवताल समजून विशेषत: शेतकरी बांधवांच्या उत्पन्नवाढी व जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रश्नांवर उपाय शोधत संवाद साधत सकारात्मक कृतीसाठी किरणकुमार जोहरे विविध प्रकारे कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला आव्हानात्मक परिस्थितीचा धैर्याने सामना करावा लागणार आहे असे ही ते म्हणाले. एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही या ध्येयाने प्रेरित होऊन ते काम करीत आहेत.
हवामान शास्त्रज्ञ म्हणजे देशाचे सैन्यच
भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे म्हणाले की भारत हवामान विभाग (आयएमडी) हे भारताची संपत्ती आहे व हवामान शास्त्रज्ञ म्हणजे हवामान बदलाची खरीखुरी माहिती देश देशवासियांचे जीव वाचविणारे देशाचे सैन्यच आहे. देशाच्या संरक्षण विभागासारखेच हवामान विभाग अत्यंत महत्वाचा आहे. सैनिकांनी उद्या सांगितले की आम्हाला बंदूक चालवता येत नाही म्हणून आम्ही देशाचे रक्षण करणे सोडून देतो तर काय होईल ? मग संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्था ज्या शेती उद्योगावर अवलंबून आहे त्यांच्या जीवनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेले हवामान शास्त्रज्ञ हे देखील सैनिकच नाहीत काय ? आम्ही ‘अंदाजे’ माहिती देतो तुमचा जीव गेला, शेतीचे नुकसान झाले तर आम्ही जबाबदार नाही असे हवामान शास्त्रज्ञानी म्हटलेले चालेल का ? असा सवाल देखील त्यांनी केला. बंदूक चालवता आली नाही तर त्याला ट्रेनिंग दिले जाते तसेच तंत्रज्ञान प्रभावी वापराचे ‘रॅपिड कमांडो ट्रेनिंग’ हवामान शास्त्रज्ञांना आवश्यकता असल्यास द्यावे आणि देशाचे रक्षण करावे. संरक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण शक्य नाही तसेच हवामान खात्याचे संपूर्ण खासगीकरण होणार नाही. त्यामुळे आहे त्यातच आपल्याला सुधारणा करावी लागेल असे ही हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे म्हणाले.
मोबाईलवर रियलटाईम हवामान माहितीचा उपाय
भारत हा पृथ्वीच्या बाहेरचा देश नाही त्यामुळे वातावरण व हवामानाचे भौतिकशास्त्राचे व एरोडायनॅमिक्सचे नियम भारतीय हवामानाला लागू होतात. खोटी कारणे देत धुळफेक करणे बंद झाले पाहिजे व जबाबदारीने वागण्याची आज खरी गरज आहे. आपल्या देशात जगातली अदयावत तंत्रज्ञान हवामान विभागाकडे आहे जनतेच्या दबावा अभावी त्याचा प्रभावी वापर होत नाही एवढेच ! डॉप्लर रडार, सॅटेलाईट, सुपर काॅम्प्युटर (एचपीसी), हजारो अॅटोमॅटिक वेदर स्टेशन या सर्वांच्या माहितीचे विश्लेषण काही सेकंदात करत देशातील १३८ कोटी जनतेला ‘अंदाज नव्हे तर रियलटाईम हवामान माहिती’ देणे शक्य आहे असे ही हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. शेतक-यांनी तशी मागणी केल्यास लोकशाही भारत देशात सरकार व प्रशासन नक्कीच राष्ट्रहिताचे सुयोग्य निर्णय घेईल. म्हणून हवामान खात्याला नावे ठेवणे आणि जोक फाँरवर्ड करण्यापेक्षा पंतप्रधान कार्यालयाला किंवा जिल्हाधिका-यांना एक इमेल किंवा पोस्ट कार्ड टाकून मागणी करत एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतो.