मुंबई ः राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार लवकरच कोसळेल असा दावा भाजपकडून केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळे काही होईल का याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. पटोले यांच्या जागी नवे अध्यक्षपद निवडताना हे पद काँग्रेसकडेच जाणार आहे, हे निश्चित मानले जात असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांनी काय केलं वक्तव्य
आम्ही कोणतीही शिडी न लावता फासे पलटू शकतो, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, त्याच्या या विधानानं राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येणार आहेत. शहा यांच्या पायगुणानं महाविकास आघाडी सरकार पडावं असं नारायण राणे यांनी शनिवारी म्हटलं होतं.मात्र महाविकास आघाडीतील तिनही पक्ष भक्कमरित्या एकत्र असून अध्यक्षपदाची निवडणूक सोपी असल्याचं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं. फासे सगळ्यांनाच टाकता येतात. फडणवीस यांनी वर्षभर बरेच फासे टाकून पाहिले पण सरकार स्थिर आहे. त्यांचे फासे गुळगुळीत झाले आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.