नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शनिवारी नव्याने निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील.
महाराष्ट्रातून दिल्लीला जाणा-या प्रत्येक व्यक्तिला ७२ तासांआधी आरटीपीसीआरचा अहवाल देणे अनिवार्य असेल. निगेटिव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागेल. दिल्लीत शनिवारी कोरोनाचे ७,८९७ रुग्ण आढळले आहेत. तिथे संसर्गाचा दर १० टक्के होता. दिल्लीत सध्या २८,७७३ सक्रिय रुग्ण आहेत.
लग्नसोहळ्यातील उपस्थितांची संख्या ५० करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी जेमतेम २० लोक उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. चित्रपटगृहातील बैठकीची क्षमता ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तीच परिस्थिती मेट्रोमध्ये असेल. दिल्लीतील स्टेडिअमवर दर्शकांविना सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी असेल.