नवी दिल्ली – देशातील ५२ तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात.
देशातील १२ तुरुंग अधिका-यांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदका’साठी निवड करण्यात आली तसेच ३९ तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे , यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर झाले. एका कर्मचा-याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.