येवला – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झाले अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर आज येवला दौ-यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. भाजपने वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही असा टोलाही त्यांनी राणेच्या वक्तव्यावर लगावला.
यावेळी भुजबळांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले असून ज्या वेळी जनता सरकारला स्वीकारते तेव्हा कोणी हात लावू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांना अदानी जाऊन भेटले असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यावरही ते बोलले, पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात, त्यामुळे अदानी पवारांना भेटल्यामुळे वीज बिल माफी रद्द झाली असे नाही. खरे तर फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही ५० हजार कोटीच्या घरात आहे, जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडल्या शिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच अशा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला. यावेळी त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अगोदर सरकार पाडून तर दाखवा मग शिडी लावायची की शिडी बॉम्ब लावायचा हे नंतर ठरवा. यावेळी ओबीसी मोर्चा बद्दल बोलतांना ते म्हणाले, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनी २७ तारखेच्या मोर्चा चे आमंत्रण दिले आहे.