नाशिक – नाशिक शहरातील व्यापारी उमेश चंद्रकांत गाडे हे १० वा मैल परिसरात ढाब्यावर जेवण करून त्यांचे इनोव्हा कारने नाशिक शहराकडे निघाले असतांना अज्ञात चार जणांनी धारधार शस्त्रांचा धाक दाखवून १६ नोव्हेंबर रात्री २.३० वाजता लुटले होते. त्यांची कारही या चोरट्यांनी लांबवली होती. पण, पोलिसांनी या गुन्हयाचा पाच दिवसात तपास करुन एका आरोपींला अटक करुन त्याच्याकडून चांदीचे कडे, चांदीची अंगठी व घडयाळ तसेच इनोव्हा कार असा ५ लाख ५ हजार ४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा गुन्हा दिंडोरी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात लुटमार केलेली पोलिसांनी कारमध्ये असलेले एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर, धारदार कोयते, स्कु ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले आहे. या गुन्हा कसा उघड झाला याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सदर घटनेबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळास भेट देऊन फिर्यादी यांचेकडे घडल्या प्रकाराबाबत चौकशी केली.
माहिती घेतल्यानंतर तपास सुरु
घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतल्यानंतर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे इनोव्हा कारची लुटमार करून नाशिक शहराचे दिशेने गेले असल्याचे समजले. पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी केली. तसेच आरोपीचे वर्णन व खब-यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हेगार हे मुंबई शहरात पसार झाले असल्याची खात्रीशीर बातमी पथकास मिळाली.
मुंबईला रवाना
खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचारी हे मुंबई येथे रवाना झाले. अंधेरी, वसई-विरार परिसरात सलग दोन दिवस पाळत ठेवत, गुन्हयातील इनोव्हा कारचा शोध घेतला. सदर इनोव्हा कार वसई येथील एव्हरशाईन बिल्डींगच्या खाली उभी दिसल्याने पथकाने सापळा रचला. गाडीतील इसमांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, पोलीसांची चाहुल लागल्याने गाडीतील चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली.
असा केला पाठलाग
भरधाव वेगाने गाडी पळून नेल्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला. पण, गर्दीचा फायदा घेत आरोपी गाडी खाली उतरून झोपडपट्टी परिसरात पळून गेला. सदर ठिकाणावरून पथकाने इनोव्हा कार ताब्यात घेतली. त्यानंतर पथकाने गुंबई पोलीसांच्या मदतीने जुहू पोलीस ठोण हद्दीतुन सराईत गुन्हेगार अमन हिरालाल वर्मा ( वय ३५, रा.समतानगर, गुलमोहर कॉसरोड, अंधेरी वेस्ट, मुंबई ) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील गुन्हयाबाबत चौकशी केली. त्यानंतर वर्माने त्याचे नाशिक येथील जेलरोड, नाशिकरोड परिसरातील साथीदारांसह गेल्या पाच दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर १० वा मैल परिसरात एका इनोव्हा कार चालकास पिस्टल व चाकुचा धाक दाखवून लुटमार केल्याची कबुली दिली.
खून केल्याचे तपासात निष्पन्न
ताब्यात घेतलेला आरोपी अमन वर्मा याच्या नाशिकरोड येथील साथीदारांने नाशिक शहरातील उपनगर परिसरात दिवाळीच्या दुस-या दिवशी एका इसमाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच नाशिक शहरातुन पळून जाण्यासाठी त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पाळत ठेवुन १० या मैल परिसरातुन वरील इनोव्हा कार जबरीने लुटमार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपी अमन वर्मा याचेविरूध्द मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वरील साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहे.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, पोलिस उपनिरीक्षक गुजर, सपोउनि रविंद्र शिलावट, पोहवा दिपक आहिरे, पोना संदिप हांडगे, अमोल घुगे, हेमंत गिलबिले, पोकॉ सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला.