नवी दिल्ली – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), ‘हरित पथ’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक झाडाची जागा, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष्य आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्षेत्राच्या कामगिरीचे निरिक्षण ठेवण्यासाठी या ॲपचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले.
एनएचएआयच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, देशातील आपल्या २५ वर्षांच्या सेवेच्या स्मृतीदिनानिमित्त नुकतेच त्यांनी ‘हरित भारत संकल्प’ ही देशव्यापी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून पर्यावरण संरक्षण आणि स्थिरता टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या बांधिलकीला टी अनुसरून आहे. या उपक्रमांतर्गत एनएचएआयने २१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय महामार्गांवर २५ दिवसांत २५ लाखाहून अधिक रोपे लावली आहेत. चालू वर्षात वृक्षारोपणाची एकूण संख्या ३५.२२ लाखांवर पोचली आहे.
राष्ट्रीय महामार्ग हरित करण्याचे सामूहिक लक्ष्य साध्य करण्यासाठी एनएचएआयच्या प्रादेशिक कार्यालयांनी देशव्यापी वृक्षारोपण मोहीम सक्रियपणे हाती घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ५ लाखाहून अधिक रोपांची लागवड झाली आहे, राजस्थानमध्ये ३ लाखांहून अधिक आणि मध्य प्रदेशात २.६७ लाख रोपांची लागवड झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरीन झाडांचे १०० % दीर्घायुमान सुनिश्चित करण्यासाठी किमान १.५ मीटर उंचीच्या वृक्षारोपण पद्धतीवर जोर देण्यात आला आहे.
झाडांना जिओ टॅग
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, हरित पथ वापरुन, वनस्पतींच्या वाढीवर आणि निरोगीपणा वर लक्ष ठेवण्यासाठी, त्या वनस्पतींच्या माहितीसह छायाचित्रे बिग डाटा अॅनालिटीक्स प्लॅटफॉर्म – डाटा लेक च्या सहकार्याने एनएचएआयच्या एआय वर प्रत्येक ३ महिन्यांनी अपलोड केली जातील. राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राटदारांकडे या वृक्षारोपणाची योग्य निगा आणि देखभाल करण्याची तसेच गहाळ/मृत झाडे बदलण्याची जबाबदारी असेल. या झाडांच्या बहर आणि वाढीवर कंत्राटदारांना या कामाचा मोबदला अवलंबून असेल. अॅप सुरू झाल्यानंतर एनएचएआयने तातडीने १५० हून अधिक आरओ/पीडी/फलोत्पादन तज्ज्ञांचा आयडी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय आज हा ॲप वापरुन सुमारे ७ हजार ८०० वनस्पतींना जिओ-टॅग देखील केला गेला आहे.
७२ लाख झाडे लावणार
पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यासाठी एनएचएआय वेळोवेळी वृक्षारोपण मोहिम राबवित आहे आणि पर्यावरण-अनुकूल पद्धतींचा अवलंब करून पर्यावरणीय समस्यांकडे सतत लक्ष देत आहे. २०२० मध्ये एनएचएआयची सातत्यपूर्ण वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची योजना आहे. राज्य सरकारच्या संस्था आणि खासगी वृक्षारोपण संस्थांसोबत संयुक्तपणे राष्ट्रीय महामार्गांवर ७२ लाख रोपांच्या लागवडीची एनएचआयची योजना आहे. याव्यतिरिक्त, एनएचएआय वृक्षारोपण, वनीकरण, शेती, बागायती क्षेत्राचा विस्तृत अनुभव असलेल्या तज्ञांची नियुक्ती करत आहे. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयासाठी योग्य क्षमता आणि अनुभव असलेले दोन व्यावसायिकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रकल्पात वृक्षारोपणाच्या योग्य देखरेखीसाठी फलोत्पादन तज्ञही नियुक्त केले आहेत. वृक्षारोपणा व्यतिरिक्त महामार्ग प्रकल्पांच्या विकासासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या पुनर्लागवडीवर देखिल एनएचआय भर देत आहे. राष्ट्रीय महामार्गांच लांबी आणि यापूर्वी केलेल्या सर्व वृक्षारोपणांचा तसेच त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाचा डाटा बेस तयार करीत आहे. देशभरात हरित महामार्ग निर्मितीत ‘हरित पथ’ मोबाइल ॲपमुळे आणखी सुलभता येईल.