नाशिक – इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास काय होऊ शकते याची प्रचिती नाशिकचा युवक प्रसाद खैरनार याच्याद्वारे येत आहे. ज्या युवकाला उठणे आणि बसणेही शक्य नव्हते अशा आजारावर मात करुन त्याने कठोर मेहनतीच्या जोरावर थेट जलतरण प्रशिक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळेच नाशिकसह राज्यातच प्रसाद विशेष चर्चेचा बनला आहे.
प्रसादला ३ जुलै १९९९ रोजी जीबीएस आजाराचे निदान झाले. अशा प्रकारचा आजार लाखात एका व्यक्तीला होत असल्याचे डॉक्टर सांगतात. या आजारावर केवळ व्यायाम हाच एकमेव उपाय आहे. प्रसादचे वडिल अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसादने जलतरण सुरु केले. आणि पाहता पाहता या आजारावर लिलया मत केली आहे. त्याने नुकताच जलतरण प्रशिक्षकसाठी बंगळुरू येथील भारतीय खेल प्राधिकरण केंद्र अर्थात साई येथे दीड वर्षांचा स्विमिंग कोचचा डिप्लोमा यशस्वी रित्या पूर्ण केला आहे. आतापर्यंत स्विमिंग कोच डिप्लोमा पूर्ण करणारा प्रसाद खैरनार हा नाशिकमधील दुसरा जलतरणपटू ठरला आहे.
असा आहे जीबीएस आजार
जीबीएस म्हणजे गुलेन बेर सिन्ड्रोम. हा अतिशय दुर्मिळ मज्जासंस्थेचा आजार आहे. तो प्रतिकारक्षमता आणि मज्जासंस्था या दोघांवर आघात करतो. या आजारात स्नायू दुबळे होतात. पॅरालिसीस सारखाच हा आजार समजला जातो.
वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन
महाभयंकर आजारावर जलतरणाद्वारे त्याने मात केली. उठता, बसता येणे शक्य नसतांना जिद्दीने आजाराला थोपवले. ज्या व्यायाम प्रकाराने नवा जन्म दिला त्यातच करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने जलतरणचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. प्रसादचे वडील अविनाश खैरनार हे व्हॉलीबॉलचे खेळाडू आणि प्रशिक्षक असल्याने त्यांनी व्यायामाच्या साहाय्याने प्रसादला आजारातून बाहेर आणले.
नवा जन्मच झाला
जलतरण खेळाचे स्वप्न पाहून प्रसादने त्यातच करिअर करण्याचे ठरवले आहे. स्विमिंग कोचचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने अहोरात्र मेहनत घेतली. जलतरण सारख्या क्रीडाप्रकारामुळे जीबीएस आजरावर मात करत प्रसादचा नवा जन्म झाला. आतापर्यंत त्याने २२ राष्ट्रीय स्पर्धांमधून त्याने १७ पदके प्राप्त केले आहेत. यात जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून शहरातील खेळाडू, परीक्षक यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Heartily Congratulations Prasad. Keep going & keep achieving new milestones. All The Best for your bright future.
Really I feel proud of u prasad. Heartly congratulations????????