नाशिक – शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोना संसर्गावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळेच त्यांना सह्याद्री हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहराची जबाबदारी स्वीकारून ते पुन्हा रणांगणात उतरले आहेत. कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी यापूर्वीही त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतानाही ते दूरध्वनीद्वारे काम करीत होते. सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर देवदत्त चाफेकर, दिनेश वाघ यांच्या अथक प्रयत्नातून आणि योग व प्राणायामद्वारे महापौर कुलकर्णी यांनी कोरोनावर मात केली आहे. नियमानुसार काही दिवस विलगीकरणात राहून महापौर पुन्हा महापालिकेत प्रत्यक्ष येऊन कार्यरत होणार आहेत. त्यादरम्यान ते आपले सर्व कामकाज सोशल मीडिया व दूरध्वनीद्वारे अविरत चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतेवेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हॉस्पिटलच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
दरम्यान, जोपर्यंत कोरोना संसर्गावर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे..