सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून महापूर येत आहे. किनाऱ्यालगतच्या भागात महापुरामुळे नवीनच समस्या भेडसावत असून या पाण्यातून साप आणि मोठे मासे रहिवासी भागात येत आहेत. अनेक विषारी साप घरात शिरल्याने नागरिक भयभित झाले आहेत.
पोर्ट मॅकक्वेरी येथील व्यावसायिक स्टुअर्ट जॉन्सन यांनी सांगितले की, पाण्याची पातळी प्रचंड वाढल्यामुळे सर्व प्रकारचे वन्यजीव रहिवासी भागात येत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-उत्तर किनाऱ्यावर सापांच्या २० पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यातील अनेक विषारी असून यात तपकिरी साप आणि लाल-काळा साप यांचा समावेश आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना धोकादायक परिस्थितीबद्दल जागरुक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.








