नाशिक – सध्याच्या कोरोना स्थितीत महापालिकेत तब्बल १०७ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नगरसेवक योगेश शेवरे यांनी केला आहे. गरज नसताना आडगाव शिवारात १०७ कोटींचा आर्थिक मोबदला देऊन भूसंपादनाच्या हालचाली गतिमान झाल्याचे शेवरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांनाही पत्र दिले आहे.
शेवरे यांनी पत्रात म्हटले आहे की, आडगाव शिवारात गट क्रमांक ६१८, ५८९, ६२२, ६२३, ७०३, ५०५, ५८३, ५८६ व इतर गटाचे आर्थिक मोबदला देऊन भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मंजूर केला आहे. सदर डीपी रोडची आज रोजी महापालिकेला आवश्यकता नसताना त्याचे भुसंपादन करुन तब्बल १०७ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान होणार आहे. कोरोना काळामध्ये महासभा ॲानलाईन होत आहे. ही बाब महासभेत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भूसंपादनासाठी प्रस्तावित या गटावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज देखील असल्याचे शेवरे यांनी सांगितले आहे. हे भूसंपादन बेकायदेशीर आहे. या परिसरात कुठलीही लोकवस्ती नाही. वास्तविक या परिसरात महापालिकेने टीडीआर देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या स्थितीत महापालिकेलाच पैशांची गरज आहे. आरोग्या उपचारांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. अशा स्थितीत महापालिका घाईघाईने तब्बल १०७ कोटी रुपये देऊन भूसंपादन का करीत आहे, असा सवालही शेवरे यांनी उपस्थित केला आहे.
भूसंपादनासाठी प्रस्तावित या जागेवर ले आऊट मंजूर झाले आहेत. अशा परिस्थितीत डीपी रस्त्यासाठी ही जागा संपादित करणे आणि सध्याच्या अडचणीच्या काळात ऐवढा आर्थिक भार नाशिककरांच्या करातून घेणे संयुक्तिक आहे का, असा प्रश्नही शेवरे यांनी पत्रातून विचारला आहे. जमिनीचे टायटल न तपासता भूसंपादनाची तत्परता का केली जात आहे, कोरोनाच्या काळात भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा हा प्रकार कदापिही खपवून घेतला जाणार नाही. वेळेप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवरे यांनी दिला आहे.