मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यामुळे घरीबसल्या नागरिकांना याचा लाभ घेता येत आहे.
चैत्यभूमी येथे होणार्या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये करण्यात आले. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता आले.
दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर देण्यात आल्या नाहीत.
यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात आले.
दूरदर्शनवर प्रक्षेपण
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जात आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
ऑनलाईन सोहळा पाहण्यासाठी
यूट्यूब: bit.ly/abhivadan2020y
फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb /
ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt
या लिंकचा उपयोग करता येईल.