स्टॉकहोम – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वापरलेली एक वाटी, लाकडाचे दोन चमचे आणि एका लाकडी काटा चमचा यांचा लवकरच लिलाव होणार आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टलला १० जानेवारी रोजी होणाऱ्या या लिलावासाठी वस्तूंची किंमत ५५ हजार ब्रिटिश पौंड ठेवण्यात आली आहे.
लिलावाचे कमिशन, जीएसटी, इन्शुरन्स आणि भारतीय कस्टम ड्युटीसह भारतात त्याची किंमत १ कोटी २० लाख एवढी होते. दरम्यान, लिलावासाठी जी काही रक्कम निश्चित होते, त्यापेक्षा जवळपास दुप्पट किंवा तिप्पट किंमतीला त्याची विक्री होऊ शकते. ऑनलाइन लिलावात तर अनेकदा हेच होते.
ऐतिहासिक वस्तू गोळा करणाऱ्यांना नेहमीच अशा जुन्या वस्तूंची आवड असते. त्यातही या वस्तू महात्मा गांधी यांनी वापरलेल्या असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते. वाटी, चमच्यांच हा सेट अत्यंत सुंदर आहे. म. गांधी यांच्या अनुयायी सुमती मोरारजी यांच्याकडे हा सेट होता. लिलावकर्त्यांचे म्हणणे आहे की, पुण्याचा आगा खान पॅलेस आणि मुंबईतील पाम बन हाउसमध्ये याचा वापर करण्यात आला होता. भारताच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.