रायगड – महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १४ वर पोहचली आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. दुर्घटना होऊन ३६ तास झाले तरी शोध आणि बचावकार्य सुरूच आहे.
ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक पोलीस श्वानपथकाच्या मदतीनं अथक प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढलं असून, आणखी आठ जणांचा शोध सुरु आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तारीक गार्डन या इमारतीचा बिल्डर फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमणे आणि अर्किटेक्ट गौरव शाह यांच्यासह ५ जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, फारुख काझी हा बिल्डर फरार असल्याचे समजते.
स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, १ जिम, १ मोकळा हॉल होता. ए विंग मध्ये एकूण २१ सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या ५४ हाेती. सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ४१ असून अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या १३ आहे. बी विंग मध्ये २० सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या ४३ हाेती. या दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ३७ आहे. अद्यापही इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची संख्या ६ आहे.
मृत झालेल्यांमध्ये सय्यद अमित समीर (वय ४५), नविद झमाने (वय ३५), नाैसिन नदीम बांगी (वय ३०) आणि आदी हाशिम शैकनग (वय १६) यांचा समावेश आहे.
अशी होती पाच मजली इमारत