कराची – पाकिस्तानच्या डोक्यावरील संकटं कधीच संपत नाहीत. शेजारी राष्ट्रांना त्रास देण्याच्या पाकिस्तानच्या वाईट हेतूंचा फटकाही त्यांनाच बसतो. अर्थात कायम अस्वस्थ राहणाऱ्या पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांमुळे तेथील सर्वसामान्य नागरिकांनाच जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महागाईसारख्या अत्यंत भयंकर संकटाचा सामना पाकिस्तानातील नागरिकांना करावा लागत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्थमंत्री डॉ. अब्दूल हफीज शेख यांना पदावरून हटविले आहे आणि त्यांच्या जागेवर आता उद्योग व उत्पादन मंत्री हम्माद अजहर यांना नवा अर्थमंत्री म्हणून नियुक्त केले आहे.
गेल्या अडिच वर्षात तिसऱ्यांना अर्थमंत्री बदलण्याची वेळ पाकिस्तान सरकारवर आली आहे. इम्रान खान यांनी वाढत्या महागाईचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने नवी टीम आणण्याचा निर्णय घेतला, असे माहिती व प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. इम्रान खान २०१८ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर हम्माद अजहर हे तिसरे अर्थमंत्री ठरणार आहेत.
आणखी काही बदल सरकारमध्ये होणार असून त्याचा निर्णय एक–दोन दिवसांत होणार आहे. हम्माद अजहर यांनी ट्वीटद्वारे आपल्या नियुक्तीची माहिती दिली आहे. इम्रान खान यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पाकिस्तानचा जीडीपी ५.६ टक्क्यांवरून -०.४ टक्क्यांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषच्या वतीने पाकिस्तानला ६ अरब डॉलरची बेलआऊट रक्कम देण्याचा विचार होत असताना अर्थमंत्री बदलण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे गेल्या एक वर्षापासून हे पॅकेज रोखण्यात आले होते. अलीकडेच सीनेटच्या निवडणुकीत युसूफ रझा गिलानी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डॉ. अब्दूल हफीज शेख यांच्या राजकीय भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. शेख यांना गेल्यावर्षी अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.