नवी दिल्ली – अतिशय बुद्धिमान आणि महाकाय असलेल्या हत्तींचा कळप अगदी छोट्या अशा मधमाशांना घाबरून पळू लागला आहे, अशी कल्पना करा. कोणाला ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कर्नाटकमधल्या जंगलातले हे वास्तव आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) मानव- हत्ती हा संघर्ष कमी करण्यासाठी मधू-मक्षिका कुंपण निर्माण करण्याचा अनोखा प्रकल्प हाती घेतला आहे. मधमाशांचा वापर करून मानवी वस्त्यांवर होणारे हत्तींचे हल्ले संपुष्टात आणावे आणि मनुष्य व हत्ती दोहोंमधील प्राणहानी कमी करावी हे या RE-HAB(Reducing Elephants-Human Attacks using Bees) या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
यासाठीचा मार्गदर्शक प्रकल्प खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील चेलुर गावाभोवतालच्या चार ठिकाणी उभारण्यात आला. नागरहोळे राष्ट्रीय अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या सीमांवरील असे भाग जिथे सातत्याने मानव-हत्ती संघर्ष घडत असतात त्या ठिकाणांवर हा प्रकल्प उभारला आहे. RE-HAB प्रकल्पाचा एकूण खर्च फक्त १५ लाख रुपये आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या राष्ट्रीय मधु योजनेअंतर्गत RE-HAB हा उप-प्रकल्प आहे. मधु योजना ही मधमाश्यांची संख्या, मधाचे उत्पादन व मधुमक्षिका-पेट्या तयार करून त्याद्वारे मधमाश्यापालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठीची योजना आहे. RE-HAB हा प्रकल्प याच मधमाश्यांच्या पेट्या विवक्षित ठिकाणी लावून त्यांच्याद्वारे हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोगाने छेद असलेल्या मधमाश्यांच्या 15-20 पेट्या जिथे हत्ती मानव संघर्षाचे प्रसंग वारंवार येतात अश्या हत्तींच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आणि हत्तींचा मानवी वस्त्यांमधील प्रवेश रोखण्यासाठी बसवल्या आहेत. या पेट्या एका तारेद्वारे जोडल्या आहेत जेणे करून हत्तीं त्या मार्गाने प्रवेश करताना त्यांचा तारांना स्पर्श होऊन मधमाश्या ह्त्तींना दूर पळवून पुढे जाण्यापासून त्यांना रोखतील. या पेट्या जमिनीवर तसेच झाडांवर टांगून ठेवल्या आहेत. हाय रिझोल्युशन, नाईट व्हीजन कॅमेरे या ठिकाणी लावले आहेत जेणेकरून मधमाश्यांचा हत्तींवर होणारा परिणाम तसेच त्यांचे या परिसरातील वर्तन याची नोंद करता येईल.
भारतात हत्तींच्या हल्ल्यांना दरवर्षी 500 जण मृत्यूमुखी पडतात. देशभरात वाघांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या दहापट ही संख्या आहे. 2015 ते 2020 मध्ये साधारण 2500 लोकांना हत्तींच्या हल्ल्यात प्राण गमावावे लागले आहेत. यापैकी 170 दुर्घटना फक्त कर्नाटकात घडल्या आहेत. विरोधाभास असा की या संख्येच्या एक पंचमांश म्हणजे 500 हत्तींनी मानवी प्रतिकारामुळे प्राण गमावले आहेत.
याआधी केंद्रीय मधमाश्या संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या KVIC शी संलग्न उपक्रमाने हत्तींना रोखण्यासाठी मधमाश्या कुंपणाच्या प्रयोगाचे परिक्षण महाराष्ट्रात केले आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाने प्रथमच मोठ्या प्रमाणावर हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. KVIC ने या प्रकल्पाचा परिणाम अभ्यासण्यासाठी पुनमपेठ येथील शेती महाविदयालय व बागकाम विज्ञान अंतर्गत वन महाविद्यालयाला सहभागी केले आहे. KVIC मुख्य सल्लागार (धोरण व शाश्वत विकास) आर. सुदर्शना, वन महाविद्यालयाचे कुलगुरू सीजी कुशलप्पा या प्रसंगी उपस्थित होते.