जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती
नाशिक ः यंदाचा महसूल दिन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
येत्या १ ऑगस्ट रोजी नाशिक महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांत महाराजस्व अभियानाची सुरुवात करून महसूल दिनाचे कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करतील. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महसूल विभाग प्रशासनाचा महसूल दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मंत्रालय ते मंडळ अधिकारी अशा सर्व पातळीवरील महसूल मंत्री यांचेसह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जोडून होणारा हा कार्यक्रम आगळा वेगळा असून जिल्ह्यात, विभागात प्रथमच असा प्रशासकीय कार्यक्रम होत आहे, अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे.
मांढरे म्हणाले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळसाहेब थोरात , नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथून विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे व इतर कक्ष प्रमुख हे या कार्यक्रमात सहभागी होतील. सर्व संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी हे त्यांचे कार्यालयातून या कार्यक्रमात सहभागी होतील. महसूल विभाग हा शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला ब्रिटीश राजवटीत जमीन महसूल वसुल आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या उद्देशाने सुरू झालेल्या या विभागात सध्या मदत व पुनर्वसन, सामाजिक अर्थ सहाय्याच्या अनेक योजन , रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अनेक योजना , निवडणुका ,नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ , अतिवृष्टी, गौणखनिज ,स्वामित्वधन, करमणूक कर, विविध खात्याची थकित वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, पाईपलाईन परवानगी, सर्व प्रकारच्या निवडणूका, जनगणना, आर्थिक गणना, कृषि गणना, आधार कार्ड, जात,रहिवाशी,मिळकत ऐपत,राष्ट्रीयत्व , जेष्ठ नागरीक, शेतकरी दाखला, भूमीहीन, अल्प भूधारक व इतर प्रमाणपञे, पाणी, चारा टंचाई, सर्व प्रकार च्या नैसर्गिक आपत्ती, मोर्चा, उपोषण, रस्ता रोको, यासह शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान, योजना व महत्वकांक्षी कार्यक्रम राबविले जातात त्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. दिवसेंदिवस या विभागाकडे सतत वाढत जाणारे कामे आणि अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या विभागातील महसूल मंत्री यांचे पासून ते गाव पातळीवरील पोलीस पाटील, कोतवाला पर्यंत सर्व घटक अहोरात्र काम करून शासनाचा गाडा खंबीरपणे ओढत असतात. १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष असते. महसूल वर्षाची सुरुवात होणारा पहिला दिवस म्हणजे १ ऑगस्ट हाच दिवस आपण महसूल दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी दिलेल्या शासकीय कामांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणार्या या यत्रणेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली आहे असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले आहे.
यावेळी महसूल दिनाचे निमित्ताने उत्कृष्ट प्रशासकीय कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुण गौरव होईल आणि येत्या १ ऑगस्ट २०२० पासून सुरु होणाऱ्या महा राजस्व अभियानाचे उद्घाटन होईल. तसेच गेल्या वर्षभरातील नाशिक जिल्हा महसूल प्रशासना द्वारे केलेल्या कामाचे अवलोकन करून आगामी वर्षभरात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख ,कार्यक्षम व गतिमान करण्याचे दृष्टीने करावयाचे वाटचाली बद्दल वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल. मंत्रालय ते मंडळ अधिकारी अशा सर्व पातळीवरील महसूल मंत्री, सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना व्हिडीओ द्वारे जोडून कोविड १९ चे पार्श्वभूमीवर नाशिक विभाग महसूल प्रशासनाद्वारे होणारा हा कार्यक्रम आगळा वेगळा असून जिल्ह्यात प्रथमच असा प्रशासकीय कार्यक्रम होत आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.