आपले आर्थिक वर्ष जरी एक एप्रिल रोजी सुरू होत असले तरी शेतीचे वर्ष निसर्ग चक्राप्रमाणे एक ऑगस्टला सुरू होते व शेतीशी घट्ट नाते असलेल्या महसूल विभागाचे नवीन वर्ष सुद्धा एक ऑगस्ट रोजी सुरू होते. एक ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.
महसूल विषय कामे सांभाळत असतानाच इतर सर्वच विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवली गेलेली असल्यामुळे महसूल विभागास शासनाचा कणा समजले जाते. काम भलेही कोणत्याही विभागाकडचे असो तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांचे लक्ष त्याकडे वेधले तर ते होऊ शकेल हा विश्वास तळागाळापर्यंत आजही टिकून राहिला आहे हे श्रेय या विभागात रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे आहे.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि आनंदाच्या प्रसंगापासून ते आपत्तीच्या प्रसंगापर्यंत प्रत्येकच बाबतीत शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने महसूल विभागाशी सर्वांचा कायमच संबंध येतो. जमीन विषयक संपूर्ण कामकाज, सामाजिक न्याय न्याय विषयक सहाय्य, कायदा आणि सुव्यवस्था , दंडाधिकारी अधिकारातील विविध दाखले, निवडणुकीचे कामकाज, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा अशा व इतर अनेक बाबींची हाताळणी आपल्या विभागामार्फत होते.
नैसर्गिक आपती, ज्यात दुष्काळ, अतिवृष्टी, अपघात किंवा सांसर्गिक आजार अशा विविध बाबींचा समावेश होतो, त्याचे व्यवस्थापन अतिशय प्रभावी रीत्या आपल्या विभागाकडून होते. जसे आता कोरोना संकटात संपूर्ण महसूल विभाग आपली सेवा एखाद्या योध्याप्रमाणे बजावत आहे.
शेतकरी आत्महत्या, शेतकरी अपघात प्रकरणात कार्यवाही करणे, लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून निराकरण करणे असो की लोकसभेपासून ते अगदी जिल्हा सहकारी बँक अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो अशा सर्व जबाबदाऱ्या आपले अधिकारी व कर्मचारी संयमाने आणि कौशल्याने पार पाडतात.
महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्प आपण सर्व अडचणींवर मात करून पूर्णत्वास नेला आहे.
आपल्या विभागात विविध प्रकारची न्यायिक प्रकरणे चालवली जातात. भावकीतील वाद असो की गरीब श्रीमंतांमधील वाद आपल्या महसुली न्यायालयात हजारो संख्येने वाद-विवाद दरवर्षी निर्णायक पद्धतीने मिटवले जातात.
महापुरुषांची जयंती पुण्यतिथी , मिरवणूका तसेच इतर धार्मिक व सामाजिक उत्सवासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या विभागाला काम करावे लागते. महसुली कर्तव्याशिवाय शेकडो प्रकारची अतिरिक्त कामे आपल्या विभागाकडून विनातक्रार केली जातात. आपल्या यंत्रणेच्या कर्तव्यक्षमतेवर असलेला शासनव्यवस्थेचा विश्वास आपल्याकडून नेहमीच सार्थ ठरवला जातो ठरवला जातो.
अश्या ह्या महसूल विभागाचे आपण सर्वजण घटक आहोत याचा आपल्या सर्वांना निश्चितच अभिमान वाटायला हवा! अहर्निश सेवा देणाऱ्या माझ्या महसूल परिवारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल- पोलीस पाटील बंधू भगिनी, सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा!
सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)