नवी दिल्ली : ‘जल्लीकट्टू’ या मल्याळी चित्रपटाची यंदा भारतातर्फे ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या विभागांतर्गत हा चित्रपट पाठवण्यात येईल. ऑस्करला जाण्यासाठी यंदा जवळपास २७ चित्रपट शर्यतीत होते. शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, छपाक, गुलाबो सिताबो, भोंसले, छलांग, चेक पोस्ट, सिरीयस मेन, बुलबुल, द स्काय इज पिंक, यांसह द डीसीपल आणि बिटरस्वीट या दोन मराठी चित्रपटांचाही समावेश होता.
‘जल्लीकट्टू’ हा सिनेमा मानव आणि प्राणी यांचे परस्परसंबंध, बेरोजगारी अशा अन्य विषयांवरही प्रकाश टाकतो. लिजो जोस पेलिसेरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अँटोनी व्हर्गीस, चेम्बन विनोद जोस, साबूमान आणि संथय बालचंद्रन यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निवड का केली, हे सांगताना चित्रपट महासंघाचे अध्यक्ष राहुल रावल म्हणाले की, चित्रपटाचा विषय तसेच दिग्दर्शन उत्तम आहे. हा चित्रपट माणसाची वाईट बाजू समोर आणतो. आपण प्राण्यांपेक्षाही वाईट आहोत हे दाखवतो. या कारणांमुळेच ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली. हा चित्रपट ऑस्करला जाणे ही, भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आतापर्यंत केवळ मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान हे तीनच चित्रपट ऑस्करला गेले आहेत. चित्रपट अभ्यासकांनी गौरवलेला ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वप्रथम दाखवण्यात आला. तर केरळमध्ये तो ४ ऑक्टोबर २०१९ मध्ये रिलीज झाला. भारतातील ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जल्लीकट्टू’चे दिग्दर्शक पेलिसेरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.