नवी दिल्ली – भारताच्या अंटार्क्टिकावरच्या मैत्री आणि भारती या दोन्ही केंद्रांची धुरा सध्या मराठी वैज्ञानिकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
हवामान खात्यात काम करणारे रविंद्र मोरे यांनी २ मार्चला मैत्री केंद्राचे प्रमुख म्हणून धुरा सांभाळली. वातावरण संशोधनांशी संबंधित विभागात कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अंटार्क्टिका मोहिमेत भाग घेतलेले आहे. भारती केंद्राचे प्रमुख म्हणून अतुल कुलकर्णी काम पाहत आहेत. पनवेलच्या इंडियन इन्सिट्युट ऑफ जिओमॅनेटिझममध्ये ते कार्यरत आहेत.
गोव्यातल्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्राकडून अंटार्क्टिका मोहिमेंचे नियोजन केले जाते. त्यांनी आज ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भारताची सध्या ४० वी अंटार्क्टिका मोहिम सुरू असून हे दोघेही यापूर्वीही अंटार्क्टिका मोहिमेत सहभागी झालेले आहेत. जानेवारीमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली आणि त्यात ४३ शास्त्रज्ञ सहभागी आहेत. सव्वा वर्षापासून अंटार्क्टिकावर असलेल्या शास्त्रज्ञांना मायदेशी पाठविण्यासाठी या मोहिमेतले शास्त्रज्ञ गेले आहेत.