नाशिक – मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी गोंधळ होऊन घोषणा बाजी झाली. अखेर आमदार फरांदे यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे ही बैठक गोंधळातच संपन्न झाली.
मराठा आरक्षणासंदर्भात औरंगाबादरोडवरील वरद लक्ष्मी लॉन्स येथे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत आमदार फरांदे या उपस्थित झाल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणात विविध बाबी सांगण्यास प्राधान्य दिले. केंद्र सरकार व मागील राज्य सरकारने काय प्रयत्न केले त्याची माहिती त्या देत होत्या. त्याचवेळी काही युवकांनी त्यांना प्रश्न उपस्थित केले. सध्या केंद्र सरकार काय मदत करणार, अशी विचारणा केली. यावेळी फरांदे यांनी युवकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत युवकांच्या भावना तीव्र होत्या. अखेर काही जणांनी घोषणा बाजी सुरू केली. तसेच, उपस्थित अनेक समाजबांधवर फरांदे यांच्या दिशेने पुढे आले. यावेळी फरांदे यांच्या हातातील माईक हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी गोंधळ झाला. अखेर फरांदे यांनी तेथून निघून जाणे पसंत केले.
फरांदे यांना कोरोनाची लागण
दरम्यान, आमदार फरांदे या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने त्यांनी अँटीजेन चाचणी केली. त्यात ही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्या कॉलेजरोडवरील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाल्या आहेत. यापूर्वी २ ते ३ वेळा त्यांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आपल्ा संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे.
उपस्थितांची चिंता वाढली
मराठा आरक्षण बैठकीस फरांदे या उपस्थित राहिल्याने उपस्थित मराठा समाज बांधवांची चिंता वाढली आहे. त्यामुळे फरांदे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असताना आता काही दिवस स्वतःला वेगळे ठेवण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.