सातारा – मराठा आरक्षण देणे शक्य नसल्यास सगळेच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मत व्यक्त केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वत्र चर्चा होत असतांना उदयनराजे भोसले यांनी मत व्यक्त केले आहे.
चांगले गुण मिळूनही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळत नाही. तसेच नोकऱ्यांमध्येही त्यांना वेळोवेळी ठोकर खावी लागते. मात्र इतर समाजातील मुलांना कमी गुण असूनही प्रवेश दिला जातो. त्यामुळे असा दुजाभाव होणार असल्यास सर्व आरक्षण रद्द करून केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जावे असे मत त्यांनी व्यक्त केले. याआधी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले होते. ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार असून निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यासह काही नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी आरक्षण विषयीप्रश्नावर त्यांनी चर्चा झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाजात प्रचंड रोष वाढत आहे. ज्या पद्धतीने अन्य समाजातील बांधवाना आरक्षण मिळाले, त्याच प्रकारचे आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करा असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.