कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे समर्थक त्यांच्या साधेपणावर चर्चा करत असतात. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. सध्या त्यांच्याकडे केवळ नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की, त्यांच्याकडे एकूण १६ लाख ७२ हजार रुपये संपत्ती आहे. त्यांच्याकडे कोणतीही गाडी नाही. ६६ वर्षांच्या या नेत्याची एकूण जंगम मालमत्ता १६ लाख ७२ हजार रुपये आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ३० लाख ४५ हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. ताज्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्र्यांकडे ६९ हजार २५५ रुपये रोख तर १५ लाख ५३ हजार रुपये बँकेत जमा आहेत. त्यापैकी १ लाख ५१ हजार रुपये त्याच्या निवडणूक खर्चाच्या खात्यात आहेत. त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) योजनेत १८ हजार ४९० रुपये जमा केले आहेत. बॅनर्जी यांच्याकडे ४३ हजार ८३७ रुपये किंमतीचे केवळ नऊ ग्रॅमचे दागिने आहेत. नेहमी साध्या साडी आणि साध्या हवाई चप्पलमध्ये दिसणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोणतेही गुन्हेगारी प्रकरण प्रलंबित नाही.