कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी विधानसभा निडणुकीत आपला पारंपरिक मतदारसंघ भवानीपूरमधून नव्हे तर नंदीग्राम मतदारसंघातून लढणार आहे. तर भाजपने ममता बॅनर्जींचेच जुने सहकारी शिवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून लढण्याचे आदेश दिले आहेत. भाजपपुढे ममता बॅनर्जींना हरविण्याचे आव्हान असले तरीही शिवेंदू अधिकारी यांनी याच मतदारसंघातून गेल्या निवडणूकीत दमदार यश मिळविले होते, याची देखील दखल तृणमूल काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.
शिवेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये असताना ममता बॅनर्जींनंतरचा सर्वांत मोठा नेता म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या वर्षभरात अनेक नेत्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्याने ममतांना फारसा फरक पडला नाही. मात्र शिवेंदू अधिकारी यांनी तृणमूलमधून बाहेर पडणे हा ममतांसाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.
शिवेंदू अधिकारी प्रवाभी जनमत असलेले नेते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी कॉलेज जीवनापासूनच राजकारणात प्रवेश केला होता. २००६ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी शिवेंदू पहिल्यांदा कांथी दक्षिण मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले. त्याचवर्षी त्यांची कांधी नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती झाली. २००९ आणि २०१४ मध्ये ते लोकसभेत पोहोचले. २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यावर्षीही त्याच मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात असले तरीही त्यांच्यापुढे त्यांचे जुने नेतृत्व खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आव्हान आहे.
पक्षासाठी कष्ट घेतले
२००७ मध्ये नंदीग्राम आंदोलनातूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. या आंदोलनाने कित्येक दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये असलेली डाव्यांची सत्ता उलथून लावली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनाची जबाबदारीच शिवेंदू अधिकारी यांच्यावर होती. त्यांनीच अपार कष्ट घेऊन मेदिनपूर, पुरुलियासारखे जिल्हे मजबूत केले.
ममतांसोबत मनभेद
एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाणारे शिवेंदू अधिकारी यांनी तृणमूलचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वसामान्यांना धक्का बसला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्याकडे राज्याचे परिवहन खाते होते. शिवेंदू यांनी राजीनामा दिल्यावर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यामागचे मुख्य कारण ममता बॅनर्जींकडून होत असलेला भेदभाव होय, असे त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी याला जास्त महत्त्व देत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र पक्षातून बाहेर पडल्यावरच त्यांनी याचा खुलासा केला.
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
भाजपतर्फे शिवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात झाली आहे. ममतांच्या विरोधात उभे केल्यामुळे त्यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाले आहे. फासे पलटले आणि ममता पराभूत झाल्या तर शिवेंदूच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील, असा अंदाज लावला जात आहे.