कोलकाता – तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेला शुक्रवारी २३ वर्षे झाली. पण हा वर्धापनदिन पक्षाला काही आनंदात साजरा करता आला नाही. कारण याच दिवशी पक्षाच्या १५ सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात कोटाई नगरपरिषदेचे माजी प्रशासकीय अधिकारी सौमेंदु अधिकारी यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील ज्येष्ठ मंत्री शुभेन्दु अधिकारी यांचे ते बंधू होत. शुभेन्दु यांनी देखील गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला.
एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष कसून तयारी करत आहेत. यात १५ सदस्यांनी पक्ष सोडणे हा तृणमूल काँग्रेसला बसलेला मोठा धक्का आहे.
सौमेंदु यांना काही दिवसांपूर्वीच महत्त्वाच्या पदावरून हटवण्यात आले होते, ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचे शुभेन्दु यांचे म्हणणे आहे. पराभवाच्या भीतीने मता बॅनर्जी यांचे सरकार नगर परिषदेच्या निवडणुकाही लांबणीवर टाकत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
भाजप प्रवेशबद्दल सौमेंदु यांनी पत्रकारांना सांगितले की, आमच्या परिवाराला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. पण तरीही आम्ही निवडणुकीतच याचे उत्तर देऊ. तर तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फिरहाद हाकिम यांनी सांगितले की, नगर परिषदेत महत्त्वाचे पद भूषवत असताना सुमेंदु यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणे योग्य नाही. पण पदावरून हटवल्यावर लगेचच त्यांनी पक्ष बदलला. थोडक्यात, आपण कोणत्याही पदाशिवाय राहू शकत नाही, हेच त्यांनी दाखवून दिल्याची टीकाही हाकिम यांनी केली.