नाशिक – ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन नाशिकमध्ये होणार असे ठरल्यापासून या संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. वेगवेगळी नावे चर्चेत येवू लागली काही जेष्ठ साहित्यिकांनी स्वत:च या स्पर्धेतून माघारही घेतली. नाशिककर साहित्य प्रेमी आणि नाशिकमधील साहित्य संस्थांचे पदाधिकारी यांच्यावतीने नाशिककर असलेले जेष्ठ साहित्यक शहाणे यांची सन्मानाने निवड व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. साहित्य संमेलना निमित आयोजित आनंद सोहळ्यात या मागणीला एकमुखाने पाठींबा दर्शविण्यात आला. नाशिकमधील सर्वच साहित्य संस्थांचे पदाधिकारी या आनंद सोहळ्यास उपस्थित होते.
नाशिक कवी, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, नाशिक शाखा, कुसुमाग्रज मराठी विचार मंच, नाशिक,संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, नाशिक,डॉ.सुधीर फडके सार्वजनिक वाचनालय, नाशिक, सर्वात्मक वाचनालय, नाशिक,सुभाष सार्वजनिक वाचनालय, साहित्य सेवा मंडळ,मराठी कथा लेखक संघ, नाशिक जिल्हा ग्रंथालय संघ, साहित्यकणा फाउंडेशन, साकव्य विकास मंच, गिरणा गौरव प्रतिष्ठान, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ-नाशिक शाखा,शारदा बहुउद्देशीय संस्था, नाशिक साहित्य मंडळ, नाशिक साहित्य मंच या संस्थांनी मनोहर शहाणे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी अशा अशयाचा ठराव करून ती पत्रे काल झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जमा केली.
२३ आणि २४ जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी विविध बैठकांसाठी आलेले आहेत. या दोन दिवसात अध्यक्षपदाबाबत निर्णय होणार आहे. त्यापूर्वी सर्व साहित्य संस्थांच्यावतीने समन्वयक म्हणून सुभाष सबनीस यांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आणि आमच्या नाशिककरांच्या मागणीचा विचार करावा असे सांगितले. या प्रसंगी महामंडळाचे मिलिंद जोशी तसेच संयोजक संस्थेचे जयप्रकाश जातेगावकर, सुभाष पाटील, डॉ.शंकर बोऱ्हाडे, नाशिक कवीचे उपाध्यक्ष अजय बिरारी आदि उपस्थित होते.