मुंबई – इतर क्षेत्रांप्रमाणेच २०२० हे वर्ष मनोरंजन क्षेत्राला काही फारसे चांगले गेलेले नाही. शिवाय चित्रपटगृहे बंद असल्याने आणि सुरु झाली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करायचा नवीन फंडा निर्मात्यांनी शोधला आहे. त्यालाच अनुसरून डिसेंबर महिन्यातही अनेक चित्रपट, वेबसिरीज यावर रिलीज होणार आहेत. यामुळे घरबसल्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.
४ डिसेंबरला झी ५ वर ‘दरबान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. मालक आणि त्याच्या नोकराची ही गोष्ट रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित आहे. शारीब हाशमी, शरद केळकर, रसिक दुग्गल आणि फ्लोरा सैनी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. याच दिवशी बॉम्बे रोज हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार आहे. या ऍनिमेशन फिल्मचे दिग्दर्शन गीतांजली राव यांनी केले आहे. सायली खरे, अमित डियोंडी आणि अनुराग कश्यप यांनी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना आवाज दिला आहे.
तर ११ डिसेंबरला अमेझॉनवर हॉरर थ्रिलर दुर्गामाता रिलीज होणार आहे. तेलगू चित्रपट भागमतीचा हा रिमेक आहे. भूमी पेडणेकर, अर्शद वारसी, माही गिल आणि कारण कपाडिया यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. जी अशोक या चित्रपटाचे दिग्दर्शक असून अक्षय कुमार निर्माता आहे. तर याच दिवशी नेटफ्लिक्सवर संजय दत्तचा टोरबाज हा चित्रपट प्रदर्शित होईल. यात संजयसोबत नर्गिस फाखरी आणि राहुल देव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात संजय एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ११ तारखेलाच झी ५ वर लाहोर कॉन्फिडेन्शियल चित्रपट रिलीज होणार आहे. यात रिचा चड्ढा, अरुणोदय सिंह, करिष्मा तन्ना आणि खालिद सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत. ही एका रॉ एजंटची कहाणी आहे. कुणाल कोहली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर २५ तारखेला अमेझॉन प्राईमवर वरून धवन आणि सारा अली खानचा कुली नंबर १ रिलीज होणार आहे. गोविंदा आणि करिष्मा कपूरच्या चित्रपटाचा हा रिमेक आहे.
याशिवाय अनेक सिरीज देखील या महिन्यात ओटीटीवर येणार आहेत. ४ डिसेंबरला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चार वेबसिरीज येणार आहेत. अमेझॉन प्राईमवर अभिषेक बच्चनची ‘सन्स ऑफ द सॉईल’ ही स्पोर्ट्स सिरीज रिलीज होणार आहे. यात जयपूरच्या पिंक पँथर्सचा प्रवास दाखवण्यात येईल. यात बिग बी देखील दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर भाग बिनी भाग ही कॉमेडी सिरीज रिलीज होणार आहे. ११ डिसेंबरला सोनी लिव्ह वर श्रीकांत बशीर ही सिरीज येणार आहे. सलमान खानच्या कंपनीने याची निर्मिती केली आहे. तर १८ डिसेंबरला झी ५ वर ब्लॅक विडोज ही क्राईम सिरीज रिलीज होणार आहे.